
डकार (सेनेगल), 08 नोव्हेंबर (हिं.स.) युथ ऑलिम्पिक्स २०२६ मध्ये भारतीय कुस्तीपटू तानियाने ७५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावत, बीच रेसलिंग प्रकारात भारतासाठी पहिले पदक जिंकण्याचा मान मिळवला. सुवर्णपदकाच्या लढतीत, तानियाला चीनच्या मिन झाओकडून २-१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. मिन झाओ ही ६९ किलो वजनी गटातील २०२५ ची 'यू-१७' विश्व कुस्ती चॅम्पियन आहे. उपांत्य फेरीत तानियाने अमेरिकेच्या मॅटिल्डा ह्रुबीचा ३-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता.
यावर्षीच्या युथ ऑलिम्पिक्समध्ये 'बीच रेसलिंग' या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेपूर्वी तानियाने सातत्याने पदके जिंकली होती; तिने बाकू, अझरबैजान येथे झालेल्या 'यू-१७' विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ६९ किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक आणि या वर्षाच्या सुरुवातीला 'यू-१७' आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले होते.
डकार २०२६ युथ ऑलिम्पिक्समध्ये भारताचे हे सातवे पदक आहे. यामध्ये तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत खुशबू रजाकभाई दर्झादाने महिलांच्या ६३ किलो ज्युडो प्रकारात, तर तन्वी पात्रीने बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवले. धिनिधी देसिंगूने महिलांच्या १०० मीटर आणि २०० मीटर फ्रीस्टाईल पोहण्याच्या शर्यतीत दोन कांस्य पदके जिंकली, तर तीर्थांक पेगूने पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक पटकावले. देसिंगू ही एकाच युथ ऑलिम्पिक्स स्पर्धेत एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली, तर पेगूने या स्पर्धेत पोहण्याच्या प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू होण्याचा मान मिळवला. याशिवाय, राजकुमारी लानचेनबी चानूने महिलांच्या 'चांगक्वान संयुक्त वूशू प्रकारात कांस्य पदक पटकावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे