
रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । शाळांना सुट्ट्या पडल्याने गावागावातील बालगोपाळ किल्ले बनविण्यात दंग झाले आहेत.
इतिहासाचे प्रेम निर्माण व्हावे याकरिता अनेक सामाजिक संस्था, युवा मंडळे, इतिहासप्रेमी नागरिक गेल्या काही वर्षांत किल्ले बनवण्याच्या स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित करत असल्याने शहरासंह अनेक गावातील बालगोपाळ सुट्टीच्या कालवधीत किल्ले बनवण्यात व्यग्र असलेले दिसून येत आहेत. याकरिता आठ ते दहा मुले एकत्र येऊन किल्ल्यासाठी आवश्यक वस्तू गोळा करताना 'टीम वर्क'चे धडे गिरवत आहेत. विविध माध्यमातून किल्ले बनवत आहेत.
किल्ल्यासाठी दगड, माती, विटा यांचे तुकडे रचून किल्ल्यावर धान्याचे कोठार, विहीर, तलाव, मावळे, मंदिर, बुरूज, तोफा, किल्ल्याची तटबंदी साकारली जात आहे. किल्ल्याची रंगरंगोटी करणे, मावळे जमा करणे, तोफा जमा करणे, याकरिता बच्चेमंडळी मोठी धावपळ करून आपला किल्ला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्न दिसत आहेत. काही मुलांनी स्पर्धेत भाग घ्यायचेही ठरविले असून त्यादृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी