
कैरो, 09 नोव्हेंबर (हिं.स.)।इजिप्तची राजधानी कैरो येथे रविवारी भीषण रेल्वे अपघात घडला. दोन प्रवासी रेल्वेगाड्यांची एकमेकांना धडक बसल्याने सात जणांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत १२५ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कैरोच्या दक्षिणेला असलेल्या गिझा प्रांतात दोन प्रवासी रेल्वेगाड्यांची धडक झाली. या भीषण अपघातात एका रेल्वे गार्डसह किमान सात जणांचा मृत्यू झाला, तर १२५ प्रवासी जखमी झाले. इजिप्तच्या राजधानीपासून सुमारे ५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या अल-अय्यात जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.
इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने या अपघाताला दुजोरा दिला असून, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्यापैकी ७० हून अधिक जखमी प्रवाशांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
परिवहन मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्येकडील फय्यूम प्रांताकडे जाणारी एक रेल्वेगाडी दक्षिण इजिप्तमधील अस्वानच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेगाडीच्या मागील डब्याला धडकली. या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्य सरकारी अभियोक्ता कार्यालयाचे तपास पथक रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिझा-फय्यूम रेल्वेगाडीची कैरो-अस्वान रेल्वेगाडीच्या शेवटच्या डब्याला धडक बसल्याने हा अपघात झाला. कैरो-अस्वान रेल्वेगाडी त्याच रेल्वेमार्गावर त्याच दिशेने उभी होती. मात्र, या धडकेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, अल-अय्यातमधील काफ्र गिर्झा येथील रहिवासी अयमन जमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर सर्वप्रथम परिसरातील स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. अपघातस्थळी सर्वत्र किंकाळ्या आणि आक्रोश सुरू होता. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकांनाही पाचारण करण्यात आले.जमाल यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे ८० जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयांमध्ये घेऊन जाताना पाहिले. काही प्रवाशांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.
-------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode