पाकिस्तानात हिंदू समुदायाकडून मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह दिवाळीचा सण साजरा
इस्लामाबाद, 09 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील कराची या किनारपट्टीवरील शहरात अल्पसंख्याक हिंदू समुदायाने रविवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह दिवाळीचा सण साजरा केला. सायंकाळ होताच मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना सुरू झाल्या. मातीचे दि
पाकिस्तानात हिंदू समुदायाकडून मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह दिवाळीचा सण साजरा


इस्लामाबाद, 09 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील कराची या किनारपट्टीवरील शहरात अल्पसंख्याक हिंदू समुदायाने रविवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह दिवाळीचा सण साजरा केला. सायंकाळ होताच मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना सुरू झाल्या. मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले, तर फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर उत्साहाने उजळून निघाला. वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शविणारा दिवाळीचा सण जगभरातील कोट्यवधी लोक साजरा करतात.

कराचीतील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी मोठ्या संख्येने हिंदू भाविक, महिला आणि लहान मुले दाखल झाली होती. नागरिकांनी नवीन कपडे परिधान करून पारंपरिक धार्मिक विधी पूर्ण केले. दीपप्रज्वलनासह फटाके फोडून त्यांनी आपल्या परंपरा जपल्या. शहरातील हिंदूबहुल वस्त्या आणि घरांना आकर्षक विद्युत रोषणाई, सजावटीच्या माळा आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. पूजाअर्चेनंतर कुटुंबीयांनी एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण केली. तसेच देशात शांतता, समृद्धी आणि बंधुभाव नांदावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

दिव्यांच्या प्रकाशाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघालेल्या कराचीच्या रात्रीने शहरातील सांस्कृतिक विविधता आणि धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवले. विविध धर्म आणि पार्श्वभूमी असलेले नागरिक एकत्र येऊन सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करतात, हा संदेश या उत्सवातून देण्यात आला.हिंदू समुदायातील सदस्यांनी परस्परांमधील प्रेम, एकोपा आणि सौहार्द अधिक वृद्धिंगत व्हावे, अशी भावना व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande