
ढाका, 09 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या सरकारने पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या दाव्याला केवळ राजकीय दिखावा असल्याचे म्हटले आहे. शेख हसीना यांचा भारतातून बांगलादेशात परतण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.काही तासांपूर्वीच शेख हसीना यांनी सरकारकडे नवीन पारपत्र (पासपोर्ट) आणि राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांना मायदेशी परतण्याची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन कागदपत्रांच्या मागणीबाबत मुख्य सरकारी अभियोक्ता मोहम्मद अमीनुल इस्लाम यांनी प्रतिक्रिया दिली. विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या शेख हसीना यांच्या अलीकडील हालचाली म्हणजे केवळ राजकीय दिखावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना इस्लाम म्हणाले की, बांगलादेशात परतण्यासाठी शेख हसीना यांनी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली नाही. नवीन पारपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबत विचारले असता ते म्हणाले, सध्या आमचे म्हणणे एवढेच आहे की, त्या परत येणार नाहीत. त्यांच्या या सर्व हालचाली केवळ राजकीय दिखावा आहेत.
दरम्यान, २०२४ मध्ये आंदोलकांवर करण्यात आलेल्या प्राणघातक कारवाईप्रकरणी विशेष न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीत सुनावण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या उठावामुळे अवामी लीगचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. त्यानंतर शेख हसीना यांना बांगलादेश सोडून शेजारील भारतात आश्रय घ्यावा लागला.यापूर्वी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी शेख हसीना यांचा उल्लेख 'फरार दहशतवादी आणि हुकूमशहा' असा केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode