
मुंबई, 09 नोव्हेंबर (हिं.स.)। रणबीर कपूर अभिनीत 'रामायण : भाग १' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला भारतासह परदेशातील चित्रपट बाजारपेठांमध्येही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील यशच्या उपस्थितीचा प्रभाव कन्नड भाषिक भागांमध्येही पाहायला मिळत आहे.
सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने रविवारी चौथ्या दिवशी भारतात ५६.१५ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये हिंदी भाषेतून ३६.७५ कोटी, कन्नडमधून ७.२५ कोटी, तेलुगूमधून ६.२५ कोटी, तमिळमधून ३.१५ कोटी आणि मल्याळममधून २.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. यापूर्वी चित्रपटाने पहिल्या दिवशी ६४.८५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४८.०५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ६९.८० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. अशा प्रकारे चार दिवसांत चित्रपटाची भारतातील निव्वळ कमाई २३८.८५ कोटी रुपये, तर एकूण कमाई २८५.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
परदेशातील चित्रपट बाजारपेठांमध्येही या चित्रपटाच्या कमाईचा सिलसिला सुरू आहे. चौथ्या दिवशी परदेशातून सुमारे ४५ कोटी रुपयांची कमाई झाल्याने चित्रपटाची एकूण परदेशी कमाई २१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ४९९.२० कोटी रुपये झाली आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule