चीनमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग, १२ जणांचा मृत्यू
बीजिंग , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।चीनमध्ये लुनर न्यू इयरच्या उत्सवाच्या दरम्यान बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. शियांगयांग शहरात फटाक्यांच्या दुकानात जोरदार स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर दुकानाला आग लागल्याने परिसरात घबराट प
चीनमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग, १२ जणांचा मृत्यू


बीजिंग , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।चीनमध्ये लुनर न्यू इयरच्या उत्सवाच्या दरम्यान बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली. शियांगयांग शहरात फटाक्यांच्या दुकानात जोरदार स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. स्फोटानंतर दुकानाला आग लागल्याने परिसरात घबराट पसरली.

माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी सुमारे २ वाजता झेंगजी टाउन येथे घडली. हा भाग हुबेई प्रांतात येतो. स्फोटानंतर सुमारे ५० चौरस मीटर परिसर आगीच्या विळख्यात सापडला. जवळपास दीड तासांच्या प्रयत्नांनंतर बचाव पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या आठवड्यातील ही दुसरी अशी घटना आहे. रविवारी पूर्वेकडील जियांगसू प्रांतात फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर आणखी दोघे जखमी झाले होते. या घटनांनंतर चीनी सरकारने मंगळवारी इशारा जारी केला. स्प्रिंग फेस्टिव्हलच्या काळात फटाके हा सर्वात मोठा धोका ठरत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

चीनमध्ये सणासुदीच्या काळात, विशेषतः लुनर न्यू इयरच्या वेळी, फटाक्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र सुरक्षा आणि वायुप्रदूषणाच्या चिंतेमुळे काही शहरांमध्ये फटाक्यांवर बंदीही घालण्यात आली आहे, तरी हा निर्णय वादग्रस्त ठरतो.चीनमध्ये फटाक्यांशी संबंधित अपघात सामान्य मानले जातात. गेल्या वर्षी जूनमध्ये हुनान प्रांतातील एका फटाका कारखान्यात स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि २६ जण जखमी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande