तुरुंगात इमरान खान यांना मारण्याचा कट? बहिणींचे पाक लष्करप्रमुखांवर आरोप
इस्लामाबाद , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।जगभरातील १४ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्य
तुरुंगात इमरान खान यांना मारण्याचा कट? बहिणींचे पाक लष्करप्रमुखांवर आरोप


इस्लामाबाद , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।जगभरातील १४ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र लिहून तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर पाकिस्तान सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याचदरम्यान, इमरान खान यांच्या बहिणींनी धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि त्यांचे सहकारी तुरुंगात इम्रान यांची हत्या करण्याचा कट रचत आहेत

इमरान यांच्या बहिणी डॉ. उजमा खान आणि अलीमा खान यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केला की पाकिस्तानी सरकार आणि लष्करी नेतृत्व त्यांच्या भावाला कोठडीत संपवण्याचा कट रचत आहे. दोन्ही बहिणींनी आसिम मुनीर यांच्यासह पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांचेही नाव घेतले.

उजमा खान यांनी सांगितले की त्यांनी अलीकडेच इमरान खान यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान इमरान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “हे लोक मला मारतील. मला संपवण्याची त्यांनी योजना आखली आहे.” बहिणींनी सध्याच्या सत्ताव्यवस्थेला “आसिम मुनीर शासन” असे संबोधत त्यांच्या भावाच्या जीवाला गंभीर धोका असल्याचे म्हटले. अलीमा खान यांनी सांगितले की इमरान खान यांच्या डोळ्यांच्या आरोग्यात झपाट्याने बिघाड होत आहे आणि त्यांना त्यांच्या विश्वासू डॉक्टरांना भेटू दिले जात नाही. त्यांच्या उपचारात निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान इमरान खान यांचा वैद्यकीय अहवाल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले असून त्यात एका डोळ्याची दृष्टी गंभीरपणे कमी झाल्याचा उल्लेख आहे. अनेक माध्यमांच्या अहवालांनुसार, इमरान खान यांच्या उजव्या डोळ्याची सुमारे ८५ टक्के दृष्टी गेली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांच्या मुलगा सुलेमान यांनी म्हटले होते, “ते एका अतिशय लहान कोठडीत ठेवले आहेत, ज्याला ‘डेथ सेल’ म्हटले जाते.”

दरम्यान, इमरान यांच्या कुटुंबाने सरकारने नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकाचा अहवाल पूर्णपणे फेटाळला आहे. कुटुंबाची मागणी आहे की त्यांच्यावर त्यांचे वैयक्तिक डॉक्टर डॉ. आसिम आणि डॉ. फैसल यांच्याकडून उपचार व्हावेत. अलीमा खान यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “तुम्ही तुरुंगात डॉक्टरांची टीम पाठवून आम्हाला तिचा अहवाल मान्य करण्यास सांगू शकत नाही — आम्ही तो स्वीकारणार नाही.”

कुटुंबाने स्पष्ट केले की इमरान खान यांना इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात हलवावे, जिथे त्यांच्या स्वतःच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि कुटुंबाच्या उपस्थितीत उपचार होऊ शकतील. तसेच, सत्य बोलल्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला. उजमा खान यांनी दावा केला की मोहसिन नकवी त्यांच्या कुटुंबाला धमक्या देत आहेत. या आरोपांमुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, सरकार किंवा लष्करी नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, इमरान खान यांच्या पक्षाने — पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) — त्यांच्या प्रकृतीबाबत, विशेषतः डोळ्यांच्या दृष्टीबाबत चिंता व्यक्त करत आंदोलन तीव्र केले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी पंजाब प्रांत आणि खैबर पख्तूनख्वा जोडणारा प्रमुख मार्ग रोखून धरला आणि इस्लामाबादमध्ये संसदेजवळ धरणे आंदोलन केले.

यापूर्वी, मंगळवारी ७३ वर्षीय इमरान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असताना जगभरातील १४ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला संयुक्त पत्र लिहून त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे या यादीत एकही पाकिस्तानी कर्णधार नाही. या १४ माजी कर्णधारांमध्ये भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचाही समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande