

अकोला, 19 फेब्रुवारी (हिं.स.)। राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण श्री शिवछत्रपतींचा जयघोष व ढोल ताशांच्या निनादात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते आज झाले.
खासदार अनुप धोत्रे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार हरीश पिंपळे,नगराध्यक्ष मायाताई धुळे, नप उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे,माजी आमदार संजय गावंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर,तहसीलदार सुनील चव्हाण,न.प.मुख्याधिकारी शशिकांत बाबर, ठाणेदार अमोल माळवे,राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड.ब्रिजमोहन गांधी,विश्वस्त पुरुषोत्तम चौखंडे, कैलास गोंडचर,अरुण जवंजाळ,भानुभाई सेदानी, नगरपरिषद सभापती, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि प्रेरणादायी विचारांना उजाळा देणारा हा क्षण अकोट येथील नागरिकांसाठी अभिमानाचा ठरला“.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. हजारो अकोटकर हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. अश्वारूढ पुतळ्याची भव्यता, शिल्पातील बारकावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी मुद्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे