
लातूर, 19 फेब्रुवारी (हिं.स.)।
ढोल-ताशांच्या गजरात स्वराज्याचा जयघोष; विठ्ठलाच्या रूपातील 'प्रगती काळे'च्या दर्शनाने आणि लेझीम पथकांनी भारावले शहर
किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शिवजयंती महोत्सव २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचारांचा जागर करत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण अहमदपूर शहरात देशभक्तीचे चैतन्य निर्माण केले.
या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठलाचे सावळे रूप आणि अफजलखान वध : मिरवणुकीचे मुख्य आकर्षण
मिरवणुकीची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळच्या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे विठ्ठल-रुक्मिणीचा अवतार आणि त्यांच्यासोबत असलेला टाळ-मृदंगाचा हरिनामाचा गजर. यात विठ्ठलाची मुख्य भूमिका प्रगती गोविंद काळे या विद्यार्थिनीने पार पाडली. विठ्ठलाचे ते सावळे आणि देखणे रूप पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले होते. अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचा हा अनोखा संगम प्रेक्षणीय ठरला. त्यासोबतच 'अफजलखान वध' या ऐतिहासिक प्रसंगाचे जिवंत सादरीकरण आणि जिजामाता रथ, घोड्यावर विराजमान शिवरायांची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सांस्कृतिक वैभव आणि कलाविष्कार
मिरवणुकीत सहभागी झालेली लेझीम पथके, झांज पथक आणि मुरळी पथक यांच्या लयबद्ध हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आले मराठे, ललाटी भंडार आणि माय भवानी या गीतांवरील नृत्यांनी वातावरणात जोश भरला. याशिवाय:रणरागिणी शिवशाही ते आजची नारी या थीममधून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. भिमशक्ती क्रांतीचा हुंकार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.मनोरंजन 'हास्य कल्लोळ' आणि 'बाबूराव स्टाईल' कॉमेडी डान्सने उपस्थितांचे मनोरंजन केले.लय-ताल ढोल-नगाडा आणि दांडिया फ्यूजनच्या तालावर विद्यार्थी व नागरिक मंत्रमुग्ध झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis