
रायगड, 19 फेब्रुवारी (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाणे हद्दीत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:०४ वाजता उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय, कर्जत येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कमला रेसिडेन्सी, सी-३०६, सहकार नगर, भानवज, खोपोली येथील रहिवासी असून ते शासकीय कर्तव्यावर कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी आरोपी क्रमांक १ (रा. गणेगाव चिंचवली, ता. कर्जत) व त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती कार्यालयातील कक्षात आले. दुसऱ्या अर्जदाराच्या नक्कल प्रती देण्यास फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपींनी रागाच्या भरात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
तसेच “बाहेर ये, तुला बघून घेतो, मारतो” अशी धमकी देत फिर्यादींच्या अंगावर धावून गेले. आरोपीने उजवा हात उगारून मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर फिर्यादी यांच्या ताब्यातील इतर दोन अर्जदारांचे अर्ज व नक्कल प्रती हिसकावून घेत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या घटनेप्रकरणी गु.र.नं. ८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 224, 132, 304, 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शरद रोकडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके