रत्नागिरी : ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह
रत्नागिरी, 19 फेब्रुवारी, (हिं. स.) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीनिमित्त अभूतपूर्व उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयु
रत्नागिरीतील शिवजयंती पदयात्रा


रत्नागिरी, 19 फेब्रुवारी, (हिं. स.) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीनिमित्त अभूतपूर्व उत्साहात पदयात्रा काढण्यात आली.

जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने आणि पोलीस बँडने दिलेल्या विशेष सलामीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

महाराजांचे शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांची युवकांना जोडणे या प्रमुख उद्देशाने शिवजयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्काऊट-गाइड, एनसीसी, एनएसएस यांच्या माध्यमातून ही पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महाराजांच्या अर्धपुतळ्यास अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, प्रीती सुर्वे, सायली पाटील, पूजा पवार, निकिता कळंबटे, जागृती पिलणकर, वैभवी खेडेकर, नगरसेवक राजीव कीर, संतोष कीर, विजय खेडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. गलांडे म्हणाले, महाराजांची युद्धनीती, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार आजच्या तरुणाईसाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून आपण त्या विचारांवर चालले पाहिजे.

ग्लोबल मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी ऋत्वी ओसवाल हिने राजमाता जिजाऊंच्या भूमिकेतून प्रभावी विचार मांडले. गोदूताई जांभेकर हायस्कूलचा विद्यार्थी कियांत सोनवले आणि शाळा क्रमांक १९ ची विद्यार्थिनी स्वप्नाली कदम या विद्यार्थ्यांनीही शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षक संपत पाटील यांनी पोवाडा सादर केला.

ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर स्टेडियमपासून निघालेली ही पदयात्रा महाराजांचा जयघोष करत मारुती मंदिर चौकात पोहोचली. विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालशिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे, कृष्ण, विठ्ठल रखुमाई, प्रभू श्रीरामचंद्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पदयात्रेची सांगता जयस्तंभ चौक येथे झाली. या सोहळ्याला ग्लोबल मराठा हायस्कूल, दामले विद्यालय, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, एनसीसी, एनएसएस, स्काऊड-गाइडचे विद्यार्थी, नगरपरिषद, जिल्हा परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande