भूसंपादनाविरोधात रविवारपासून 'बाधित शेतकरी संघर्ष यात्रा'
Against land acquisition from today
भूसंपादनाविरोधात रविवारपासून 'बाधित शेतकरी संघर्ष यात्रा'


नाशिक, 21 फेब्रुवारी (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यात विकास व कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीच्या नावाखाली सुरू असलेल्या जमीन भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकरी संघर्ष यात्रेचे आयोजन २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात्रा सकाळी ९ वाजता आडवण, पारदेवी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून सुरू होणार आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसी व विविध रस्त्यांसाठी तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत असून, या प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून दडपशाही होत असल्याचा आरोप आहे. काही शेतकरी न्यायालयात दाद मागत असले तरी अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे सांगण्यात आले. विविध भागांत आंदोलनाचे हत्यार उपसूनही प्रशासनावर कोणताही परिणाम होत नसल्याने आता 'मुंबई ट्रॅक्टर मोर्चा' आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. ही यात्रा आडवण, पारदेवी साकूर मार्गे चिंचोली, मखमलाबाद, अंबड, सातपूर, राजूर बहुला, त्र्यंबकेश्वर, घोटी, आहुर्ली मार्ग पुन्हा आडवण येथे समारोप होणार असल्याची माहिती देण्यात आली. या संघर्ष यात्रेद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. या आंदोलनाचे आयोजन आडवण, पारदेवी शेतकरी कृती समिती व प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande