
कोल्हापूर, 21 फेब्रुवारी (हिं.स.) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात येत्या २३ फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन छेडण्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गोलमेज परिषद घेण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेत्यांची ऑनलाईन झूम बैठक काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटण्यासाठी कृतिशील असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यांतील शेतकरी व पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली.
‘लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प नको’ – सतेज पाटील
आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर भूमिका बदलल्याचा आरोप केला. “गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग राबवू नये. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र आता त्यातून माघार घेतली जात आहे,” असे ते म्हणाले. महामार्गासाठीचा निधी सध्याच्या खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरावा, मोजणीला विरोध करावा आणि ग्रामसभांचे ठराव मंजूर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. २३ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन छेडण्याचा आणि विधिमंडळात ठाम भूमिका मांडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘स्थानिकांचा तीव्र विरोध स्पष्ट’ – राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणी व लातूरमधील घटनांचा निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना शेतकरी रस्त्यावर उतरले, यावरून स्थानिकांचा तीव्र विरोध स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होण्याची भीती व्यक्त करत, महामार्ग खाजगीकरणातून राबवला जात असल्याने स्थानिकांना त्याचा फायदा होणार नसल्याचा आरोप त्यांनी केला. २० ते २५ फूट भरावामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल, असेही ते म्हणाले. सरकारने महामार्ग बंदचा निर्णय जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.
‘प्रभावित गावांचा रोष लक्षात घ्या’ – ऋतुराज पाटील
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महायुती सरकारवर टीका करत करवीर तालुक्यातील अनेक गावे या मार्गामुळे प्रभावित होणार असल्याचे सांगितले. लोकांचा रोष लक्षात घेऊन सरकारने प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुमारे‘५०० एकर जमीन बाधित होणार’ – राजेश पाटील
माजी आमदार राजेश पाटील यांनी बीडमधील घटनेचा निषेध करत चंदगड तालुक्यातील दहा गावांमधून मार्ग जात असल्याने सुमारे ५०० एकर शेतजमीन बाधित होणार असल्याचा दावा केला. इको-सेंसिटिव्ह झोनमधून मार्ग नेला जात असल्याचा आरोप करत गडहिंग्लज परिसरातून कडाडून विरोध करण्याचा इशारा दिला.
बैठकीत समितीचे समन्वयक गिरीष फोंडे, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर, कॉम्रेड उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, ऍड. गजेंद्र येळकर (लातूर), व्यंकटराव ढाकणे (बीड), सुभाष मोरलवार (नांदेड), बापूराव ढोरे (हिंगोली) आदी उपस्थित होते. धाराशिवचे संभाजी फरताडे यांनी आभार मानले.
दरम्यान, २३ फेब्रुवारीच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत सर्व संघटनांची गोलमेज परिषद घेऊन विधानसभेत व बाहेर सरकारला जाब विचारला जाईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar