
कोल्हापूर, 21 फेब्रुवारी (हिं.स.) : कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मार्केट यार्ड मधील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगामातील पहिला सौदा पार पडला. या सौद्यामध्ये १५ आंब्यांच्या पेटीला एकूण सहा हजार एकवीस (₹6,021) रुपये इतका भाव मिळाला.
रत्नागिरीतील बेर्डे येथील शेतकरी आकाश तोडकर यांनी तयार केलेली पहिली पेटी फळ व्यापारी प्रसाद वळंजु यांनी घेतली. यंदा हवामान बदलामुळे आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसला असून, फुलोऱ्याचे प्रमाण जास्त असले तरी अपेक्षित फळधारणा झाली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात निराशा होती.
तथापि, हंगामातील पहिला आंबा रत्नागिरीहून कोल्हापुरात पोहोचल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने दरांमध्ये वाढ दिसून येत आहे. कोल्हापूर बाजार समितीत १५ आंब्यांच्या पेटीला मिळालेला भाव शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करत असून, मे महिन्यापर्यंत आंब्याचे दर अधिकाधिक स्थिर राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar