त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कामांवरून शेतकरी-साधू आंदोलन तीव्र
Farmers and monks visit Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कामांवरून शेतकरी-साधू आंदोलन तीव्र


त्र्यंबकेश्वर, 21 फेब्रुवारी (हिं.स.) : येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी जमिनी संपादित करण्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. प्रकल्पात दोन प्रमुख आखाड्यांच्या जमिनींचाही समावेश असल्याने साधू-महंतही आंदोलनात उतरले आहेत. योग्य मोबदला आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्याने जाहीर करण्यात आलेले सामूहिक आत्मदहन आंदोलन आमदार हिरामण खोसकर यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास स्थगित करण्यात आले असले, तरी न्याय मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

रिंग रोड व घाट बांधकामासाठी संपादन

सिंहस्थ आराखड्यांतर्गत रिंग रोड आणि घाट बांधकामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसह दोन आखाड्यांच्या जागाही बाधित होत असल्याने नाराजी वाढली आहे. प्रशासनाच्या धोरणाविरोधात बडा उदासी आखाड्याचे महंत दानमुनी महाराज यांनी तीव्र भूमिका घेत धार्मिक कार्यासाठी असलेल्या जमिनी हिसकावून घेऊ देणार नसल्याचा इशारा दिला.

आंदोलनकर्त्यांनी निषेधार्थ प्रतीकात्मक ‘सरण’ (चिता) रचून सरकारला इशारा दिला. कवडीमोल मोबदल्यामुळे संसार उघड्यावर येणार असल्याने टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. महंतांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला धार्मिक आणि सामाजिक अशी दुहेरी धार प्राप्त झाली असून प्रशासनावरील दबाव वाढला आहे.

आमदारांची मध्यस्थी, निर्णयाची प्रतीक्षा

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खोसकर यांनी घटनास्थळी धाव घेत तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांना पाचारण केले. यावेळी साधू-महंत आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. हा प्रश्न विधिमंडळात मांडण्याचे तसेच मंगळवार-बुधवारपर्यंत शासनासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.आमदारांच्या विनंतीचा मान राखून २१ फेब्रुवारी रोजी होणारे सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

धार्मिक जमिनींचा प्रश्न गंभीर

प्रकल्पात दोन आखाड्यांच्या जागा संपादित होत असल्याने साधू-महंतांमध्ये अस्वस्थता आहे. सिंहस्थ नियोजनात आखाड्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलनात महंत दानमुनी, महंत दिगंबर अजयपुरी, बाधित शेतकरी तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.----------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande