
जळगाव, 21 फेब्रुवारी, (हिं.स.) २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या क्रीडांगणावर खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. अवयवदानाबद्दल जनजागृती करणे तसेच अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण लाभार्थी यांच्या आरोग्य व जिद्दीचा सन्मान करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेत एकूण ४०० विद्यार्थ्यांसह २० अवयवदाते आणि प्रत्यारोपण लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक व्हि. एल. माहेश्वरी (कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), प्राध्यापक एस. टी. इंगळे (प्र-कुलगुरू), दीपमाला काळे (महापौर, जळगाव महानगरपालिका), डॉक्टर नरेंद्र ठाकूर (लोकनियुक्त नगराध्यक्ष, एरंडोल), प्राध्यापक अनिल डोंगरे (अधिष्ठाता, कॉमर्स आणि मॅनेजमेंट), दत्तात्रय चौधरी, सुधीर चौधरी (डायरेक्टर, मास-टेक कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि आनंद मल्हार (संचालक, मल्हार कम्युनिकेशन) उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे अवयवदानाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन माहेश्वरी यांनी केले. तर दीपमाला काळे यांनी स्वतः भविष्यात अवयवदान करण्याचे मनोगत व्यक्त केले. हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धा नसून अवयवदानाच्या पवित्र कार्याला समाजात बळ देणारा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. या उपक्रमाचे आयोजन किशोर सूर्यवंशी, छाया किडनी केयर अँड रिलीफ फाउंडेशन, डॉक्टर अमित भंगाळे (आनंद हॉस्पिटल आणि डायलेसिस युनिट), सुखकर्ता फाउंडेशन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश पाटील (डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स), डॉ. अतुल बारेकर (असोसिएट प्रोफेसर), लीना लेले, सोनल चव्हाण, निकिता चौधरी आणि व्यवस्थापन शास्त्र प्रशाळाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात अवयवदान शपथ घेऊन करण्यात आली. त्यानंतर छोटेखानी मशाल रॅली काढण्यात आली. पुढे विद्यार्थ्यांसाठी ५ किमी व ३ किमी मॅरेथॉन तसेच अवयवदाते व लाभार्थींसाठी १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. अवयवदाते व लाभार्थी गटातील पुरुष विभागात १०० व २०० मीटर शर्यतीत वसीम पिंजारी, हर्ष शर्मा आणि प्रवीण आमोदकर हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. महिलांच्या विभागात सायराबी हमीद पिंजारी, वर्षा झोपे आणि मनीषा पाटील या अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या ठरल्या. विद्यार्थी गटात मुलांच्या विभागात ५ किमी आणि ३ किमी स्पर्धेत अजय वसावे आणि जयपाक पावरा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या विभागात ५ किमी आणि ३ किमी स्पर्धेत मधुरा वसावे आणि जैदु बारेला यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना लेले आणि सुभाष पवार यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर