

- तिसऱ्या आणि निर्णायक टी-20सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी मात- भारतीय महिला संघाने मालिका २-१ ने जिंकली- स्मृती मानधनाची 82 धावांची खेळी
अॅडलेड, 21 फेब्रुवारी (हिं.स.)भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत करत मालिका २-१ ने जिंकली. भारतीय महिला संघाने या विजयासह इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टीम इंडियाचा हा पहिलाच टी-२० मालिका विजय आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने स्मृती मानधना (८२) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (५९) यांच्या अर्धशतकांमुळे २० षटकांत 6 विकेट्स गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला निर्धारित षटकांत नऊ बाद १५९ धावाच करता आल्या.
भारताकडून श्रेयंका पाटील आणि श्री चरणी यांनी शानदार गोलंदाजी केली. श्रेयंकाने चार षटकांत २२ धावा देत तीन विकेट्स घेतल्या, तर चरणीने ३२ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. अरुंधती रेड्डीने दोन, तर रेणुका ठाकूरने एक विकेट घेतली.
भारताकडून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी डावाची सुरुवात केली. पण शेफाली जास्त काळ क्रीजवर टिकू शकली नाही आणि तिला किम गार्थने बाद केले. शेफाली सात धावांवर बाद झाली. त्यानंतर मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी जबाबदारी स्वीकारली आणि एक शानदार भागीदारी रचली, भारतीय डाव स्थिरावला. या काळात मंधानाने षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. जेमिमाहनेही अर्धशतक झळकावले.
मंधाना आणि जेमिमाह व्यतिरिक्त, भारतीय महिला संघाच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारताकडून मंधानाने सर्वाधिक ५५ चेंडूत ८२ धावा केल्या, ज्यामध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. जेमिमा ४६ चेंडूत ५९ धावा करून बाद झाली, ज्यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. रिचा घोषने सात चेंडूत १८ धावा करून बाद झाली, ज्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार होता, तर अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा एका धावेने बाद झाल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर दोन धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने दोन विकेट्स घेतल्य़ा, तर किम गार्थ आणि मोलिनेक्सने प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. क्रांति गौडची जागा श्रेयंका पाटीलने घेतली. ऑस्ट्रेलियानेही एक बदल केला, निक कॅरीच्या जागी ग्रेस हॅरिसला संधी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे