
परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।तालुक्यातील पिंगळी येथील श्री गोकुलताथ मंदिर परिसरात २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित ४४ व्या स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन आज (दि. २६) मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ गरुड हे होते, तर उद्घाटक म्हणून वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पिंगळीचे सरपंच अंगद गरुड, आबा गरुड, प्रा. उपेंद्र दुधगावकर, सुनीता गुळवे, सुधाकर आंदोले, दीपक धुतमल, माजी जिल्हा आयुक्त (गाईड) लटपटे, छाया कनकुटे, रमेश जाधव, शेख मॅडम, मेहर मॅडम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पथसंचलन स्पर्धा, तंबू उभारणी, बिनभांड्याचा स्वयंपाक, शेकोटी कार्यक्रम, तंबू निरीक्षण, बँड पथक स्पर्धा, शोभायात्रा, प्रदर्शनी स्पर्धा, मानवी मनोरे स्पर्धा तसेच प्रथमोपचार स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याचा विकास, शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय या मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis