कोल्हापूरच्या औद्योगिक भरारीला 'महानिर्यात इग्नाईट'ची साथ
कोल्हापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित ''महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६'' कार्यशाळा राजर्षी शाहू सभागृह, सर्किट
'कोल्हापूरात महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६


कोल्हापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित 'महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६' कार्यशाळा राजर्षी शाहू सभागृह, सर्किट हाऊस येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत राज्यामध्ये ९२ टक्के प्रगतीसह अग्रस्थान पटकावल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेऊन सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोल्हापूरच्या समृद्ध वारशाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांच्या निर्यातीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरी गुळ, चप्पल आणि चांदी उद्योगाची गुणवत्ता सुधारून त्यांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी उद्योजक आणि औद्योगिक संघटनांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ शहरापुरते मर्यादित न राहता चंदगड, शाहूवाडी आणि गगनबावडा यांसारख्या दुर्गम भागातील नाचणी, रताळे यांसारख्या स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया उद्योग निर्माण करून ती निर्यातक्षम बनवण्यासाठी विशेष पावले उचलली जावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे आणि ज्या गावांमध्ये अद्याप लाभार्थी सहभागी नाहीत, अशा गावांची निवड करून तिथे उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले.

उद्योजकांच्या सोयीसाठी उद्योग विभागाने सुरू केलेल्या 'मैत्री कायद्या'ची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, एकाच छताखाली सर्व परवानग्या विहित वेळेत देण्यासाठी 'मैत्री पोर्टल' कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच महसूल विभागाचे विविध परवानेही आता ऑनलाइन उपलब्ध असल्याने उद्योजकांनी या पारदर्शक प्रणालीचा लाभ घ्यावा. औद्योगिक धोरण २०२५, निर्यात धोरण, लेदर फुटवेअर धोरण आणि लॉजिस्टिक पार्क यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांबाबत उद्योग विभागाशी समन्वय साधून जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी योगेश कुलकर्णी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या तब्बल २९९० योजनांची माहिती संकलित केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, जी उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उद्योग सहसंचालक संदीप रोकडे, भारतीय पोस्ट सेवेचे वरिष्ठ अधीक्षक वैभव वाघमारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, आयडीबीआय कॅपिटलचे मुकुंद तिवारी आणि डीजीएफटी सल्लागार अक्षय कोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कमलकांत कुलकर्णी, शिरोली असोसिएशनचे जयदीप चौगुले, स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे आय. ए. पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, व्यवस्थापक विकास कुलकर्णी व बालाजी बिराजदार यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande