
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
लातूर ग्रामीणमधील रेणापूर तालुक्यात 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बऱ्याच भागात गारपिट झाल्याने शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी, करडी, ऊस व अन्य पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे रेणापूर तालुक्यात झाले आहे. त्यामुळे रेणापूरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी आमदार व लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार व लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेली अनेक पिके डोळ्यादेखत भुईसपाट झाली आहेत. काढून ठेवलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार रेणापुर तालुक्यातील 8 हजार हेक्टरहून अधिक जिरायती आणि 700 हेक्टरहून अधिक बागायती आणि 35 हेक्टरहून अधिक फळपीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असली तरी रेणापूर तालुक्यात नुकसानीचे प्रमाण नक्कीच जास्त आहे. याबाबतचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईलच. मात्र गेल्या तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यामुळे लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे रेणापूर तालुक्यात झाले आहे. पिकांच्या व फळबागांच्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन आपण शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा अशी माझी मागणी आहे असे श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis