लातूर यात्रा महोत्सवात दिव्यांग विद्यार्थिनींना मिळावा विशेष आनंद
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित यात्रा महोत्सवात केवळ भाविकांची गर्दीच नाही, तर सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडत आहे. गुरुवारी देवस्थानाने एका विशेष उपक्रमाचे आयोजन केले, ज्यात स
सिद्धेश्वर यात्रा


लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित यात्रा महोत्सवात केवळ भाविकांची गर्दीच नाही, तर सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडत आहे. गुरुवारी देवस्थानाने एका विशेष उपक्रमाचे आयोजन केले, ज्यात सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींच्या मुकबधीर विद्यालयातील १४८ विद्यार्थिनींनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री सिद्धेश्वराच्या भावपूर्ण महाआरतीने झाली. त्यानंतर या विद्यार्थिनींनी यात्रेतील विविध पाळणे, खेळ आणि मनोरंजन स्टॉल्सची भेट घेतली. देवस्थानाने नेमलेल्या स्वयंसेवकांच्या मदतीने सर्व मुलींनी सुरक्षितपणे खेळांचा आनंद घेतला.

विनाशुल्क सोय आणि महाप्रसाद

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यात्रा पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली होती. खेळ आणि मनोरंजनानंतर सर्व विद्यार्थिनींसाठी देवस्थानाने विशेष महाप्रसादाची व्यवस्था केली. अनेक दिवसांपासून यात्रेची ओढ असलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून देवस्थानाचे विश्वस्त आणि उपस्थित भाविक भारावून गेले.

प्रशासकीय पुढाकार

हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानाचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, रमेश बिसेन, विशाल झांबरे, ओम गोपे, महादेव खंडागळे आणि सिद्धेश्वर उकिरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. देवस्थान प्रशासनाने सांगितले, “यात्रेचा आनंद घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या श्रमाचे चीज आहे.”

लातूरच्या या यात्रा महोत्सवाचा आनंद सोहळा दि. २ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे यात्रेची उंची अधिकच वाढली आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande