
रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे डोलवी गावात जेएसडब्ल्यू कंपनीसमोरील पुलावर मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला असून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेश बाळकृष्ण जाधव (वय ३४ वर्षे, रा. पन्हळघर, ता. माणगाव) हे त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच-06 बीझेड 8347 ने मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडे जात होते. डोलवी गावाच्या हद्दीत जेएसडब्ल्यू कंपनीसमोरील पुलावर गोवा बाजूकडे जाणाऱ्या लेनवर असताना मिक्सर ट्रक क्रमांक एमएच-04 केयू 0532 वरील चालकाने अचानक लेन बदलत ट्रक डावीकडे घेतल्याने ट्रकच्या मागील बाजूची जोरदार धडक मोटारसायकलला बसली.
या धडकेत महेश जाधव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुजाता महेश जाधव या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला.या प्रकरणी वडखळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 12/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 281, 106(1), 125 (अ), 125 (ब) तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कोंडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके