बार्शीटाकळी : युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। बार्शीटाकळी तालुक्यातील राहीत गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाकडून आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका युवकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Photo


अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। बार्शीटाकळी तालुक्यातील राहीत गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाकडून आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एका युवकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहीत येथे बीट जमादार व कर्मचारी गस्त घालत असताना अनिल वाहूरवाघ नावाच्या युवकाने अचानक घोषणाबाजी सुरू केली. “अधिकारी भ्रष्टाचार दडपतात, आता मला जगायचे नाही,” अशी आरोळी देत त्याने प्लास्टिकच्या कॅनमधील ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला.घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित युवकाला पकडले व त्याच्या हातातील कॅन दूर फेकून दिली. जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली.

यानंतर पोलिसांनी युवकाची समजूत काढत विचारपूस केली असता, त्याने जिल्हा व तालुका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस चौकशी होत नसल्याचा आरोप केला. संबंधित अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असून शासन निधीचा अपव्यय होत असल्याचा गंभीर आरोप त्याने केला. “चौकशीच होत नसेल तर जगून काय उपयोग?” असे म्हणत आत्मदहनाचा निर्धार त्याने व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारीही तेथे पोहोचले. आंदोलनकर्ते युवक व अधिकारी यांच्यात चर्चा झाली; मात्र तत्काळ तोडगा न निघाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.

शेवटी प्रशासनाकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे लेखी आश्वासन युवकाला देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी युवकाला पुढील चौकशीसाठी पिंजर पोलीस ठाण्यात रवाना केले.या घटनेमुळे तालुक्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एक जीव वाचला असला, तरी या प्रकाराने स्थानिक पातळीवरील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande