
अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ‘हॉर्टिकल्चर डे’ निमित्त फळे, भाजीपाला, फुलपिके तसेच औषधी व सुगंधी वनस्पती पिकांच्या दोन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.
दोन्ही दिवस विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकरी बांधवांसाठी अवलोकनाकरिता खुले राहणार असून विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून शंका समाधान केले जाणार आहे. यासोबतच कृषीविषयक भव्य प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या हॉर्टिकल्चर डे निमित्त तब्बल 370 एकर क्षेत्रावर उद्यानविद्याविषयक 703 पिकांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत. यामध्ये 33 भाजीपाला पिकांचे 38 वाण 20 एकर क्षेत्रावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच 42 फळ पिकांचे वाण 300 एकर क्षेत्रावर लागवड तंत्रज्ञानासह दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय 10 एकर क्षेत्रावर 540 औषधी व सुगंधी वनस्पतींची प्रात्यक्षिके ठेवण्यात आली आहेत.या दोन दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह विशेषतः विदर्भातून अंदाजे एक लाख शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी, कृषी विस्तार अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती व विद्यार्थ्यांनी या अद्वितीय संधीचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे