
अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा‑1’ राबविण्यात येत असून, सर्व तालुक्यांत महसूल मंडळ व नगर परिषद पातळीवर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
या शिबिरांमध्ये सात‑बारा, नमुना‑९, नामबदल, महसूल कर, वन‑विभागाच्या मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र अशा अनेक महसूल आणि इतर सरकारी सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव व नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नाही. एकाच छताखाली महसुली सेवांचा लाभ मिळणार असल्याने वेळ वाचणार आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या मार्गदर्शनात या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. इतर शासकीय विभागांचा सहभागही मिळविण्यात आला आहे. त्यामुळे विविध दाखले, लाभ आदी मिळून प्रलंबित बाबींचे निराकरण होण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी सदर शिबिराच्या दिवशी उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला तालुक्यात दहिहंडा व घुसर (७ मार्च), शिवणी व सांगळूद (१४ मार्च), कापशी व पळसो (१० एप्रिल), आगर व उगवा (१७ एप्रिल), बोरगाव मंजू व कुरणखेड (८ मे), अकोला व कौलखेड (१५ मे) येथे शिबिरे होतील.
पातूर तालुक्यात आलेगाव (७ मार्च), बाभुळगाव (१४ मार्च), सस्ती (१० एप्रिल), चान्नी (१७ एप्रिल), पातूर (८ मे) येथे समाधान शिबिरे होतील.
बाळापूर तालुक्यात उरळ (७ मार्च), पारस (१४ मार्च), निंबा (१ एप्रिल), हातरूण (१० एप्रिल), व्याळा (१७ एप्रिल), वाडेगाव (८मे), वाळापूर मंडळ व नप (१५ मे) येथे शिबिरे होतील.
मूर्तिजापूर तालुक्यात जामठी (७ मार्च), मूर्तिजापूर (१४ मार्च), लाखपुरी (१० एप्रिल), निंबा (१७ एप्रिल), हातगाव (८मे), शेलू बाजार (१५ मे), माना (२२ मे), कुरूम (२९ मे) अशी शिबिरे होतील.
बार्शिटाकळी तालुक्यात दोनद खु. (७ मार्च, खेर्डा बु. मंडळ), पिंजर (१४ मार्च), धाबा (१० एप्रिल), पुनोती बु. (१७ एप्रिल, राजंदा मंडळ), महान (८मे), बार्शिटाकळी (१५ मे) याप्रमाणे शिबिरे होतील.
अकोट तालुक्यात मुंडगाव (७ मार्च), पणज (१४ मार्च), अकोलखेड (२१ मार्च), चोहोट्टा (२८ मार्च), कुटासा (१० एप्रिल), आसेगाव (१७ एप्रिल), उमरा (८ एप्रिल), अकोट (१५ एप्रिल) येथे शिबिर होईल.
तेल्हारा तालुक्यात पाथर्डी (७ मार्च), पंचगव्हाण (१४ मार्च), मालेगाव (१० एप्रिल), अडगाव (१७ एप्रिल), हिवरखेड (८ मे), तेल्हारा (१५ मे) येथे शिबिरे होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे