
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील उगवा फाटा ते आगर या रस्त्याचे डांबरीकरण, तसेच चिंचखेडा नाला आणि मळखेड नाल्यावरील दोन पुलांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच रेल्वे गेट ते अमानतपूर–ताकोडा–भोडपर्यंतचा रस्ताही मंजूर असताना, अद्याप या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही.या संदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.तसेच मंजूर कामे सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मागणीनुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, उलट्या माठावर पाणी टाकून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे