रत्नागिरी : कुटुंबातील परंपरा, नाती जपण्याचा संदेश देणारे नाटक - 'रेशनकार्ड'
रत्नागिरी, 3 फेब्रुवारी, (हिं. स.) : माणसाच्या जीवनात कुटुंबात येणारे सुख आणि दुःखातही माणसे एकत्र असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो. जुन्याजाणत्या बुजुर्गांनी ही परंपरा जपली, कुटुंबे एकत्रित ठेवली, नाती जपली, पण अलीकडे सगळेच बदलले आहे. ग्रामीण भा
रेशन कार्ड नाटकातील दृश्य


रत्नागिरी, 3 फेब्रुवारी, (हिं. स.) : माणसाच्या जीवनात कुटुंबात येणारे सुख आणि दुःखातही माणसे एकत्र असतील तर त्याचा परिणाम चांगला होतो. जुन्याजाणत्या बुजुर्गांनी ही परंपरा जपली, कुटुंबे एकत्रित ठेवली, नाती जपली, पण अलीकडे सगळेच बदलले आहे. ग्रामीण भागात वृद्ध आई-वडील एकटे राहण्यापेक्षा त्यांची मुले मुंबईत घेऊन जातात. त्यामुळे आज गावे ओस पडत आहेत. कुटुंबातील नात्यांमध्ये दुफळी निर्माण होते. याचे उत्तम दर्शन राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या 'रेशन कार्ड' या पहिल्या नाटकातून रसिकांना पाहायला मिळाले.

राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीच्या स्वा. सावरकर नाट्यगृहात सुरू झाली आहे. स्पर्धेत पहिल्या दिवशी लेखक-दिग्दर्शक प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेतून रेशन कार्ड नाटकाचा प्रयोग दादरच्या अमर हिंद मंडळ संस्थेने २ फेब्रुवारी रोजी रात्री सादर केला. २५कलाकारांचा अभिनय, उत्तम नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा अशा सर्व अंगांनी नाटक रंगले.

ग्रामीण जीवनावर आधारित मालवणी भाषेचा लहेजा असलेल्या 'रेशनकार्ड' नाटकाची संहिता वेंगुर्ल्याच्या परब कुटुंबात घडते. परब आजोबांचे निधन झाल्यावर त्यांच्या मुलगा सुभाष आईला गावातून मुंबईत घेऊन येतो. मुंबईत तिचा एकाकीपणा वाढतो. शेजारी बापट काका आणि इतर शेजारी तिला बोलण्यासाठी प्रवृत्त करतात, पण शक्य होत नाही. इकडे सुभाष व मुलगा अभिषेक आणि त्याची बहीण दीदी यांच्यातही एकमेकांमध्ये पटत नाही. दररोज किरकोळ कारणातून खडाजंगी होत असते. मात्र यामध्ये आई सगळ्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यांचा संसार विभक्त होण्याच्या मार्गावर असतो. सुभाष आणि त्यांचा मुलगा अभिषेक व दीदी एकत्र यावेत म्हणून बापट काका झटत असतात. पण नव्या पिढीला त्यांचे विचार पटत नसल्यामुळे त्यांनाही ते शक्य होत नाही. अखेर बापट काकादेखील एकटपणातून आत्महत्या करतात.

इकडे अभिषेक कंपनीत प्रमोशनकरिता कागद जोडण्यासाठी आईकडे रेशन कार्ड मागत असतो. प्रमोशन मिळाल्यावर तो चाळीतील खोली सोडून दुसरीकडे राहायला जाणार असतो. त्याचे एका मुलीबरोबर प्रेम असते. दीदीला पण चांगली नोकरी लागते, पण भावंडांमध्ये कधीच पटत नाही. अनेक दिवस अभिषेक कार्ड मागत असतो, पण ती देत नाही. एकेदिवशी सगळेच आई-वडिल अभिषेक, दीदी रेशनकार्ड शोधण्यासाठी घरातील सगळे सामान बाहेर काढतात. पण रेशनकार्ड मिळत नाही. त्यावेळी वडिलांनी तरुणपणी आईला लिहिलेली चिठी सापडते. आईवडिलांच्या लग्नाचा अल्बम सापडतो आणि सगळे कुटुंब एकत्र येते. आई लपवलेले रेशनकार्ड अभिषेकला देते. कुटुंब, नाती एकत्र आल्याचा आनंद व्यक्त होत असतो. त्याचवेळी चाळीतील दोघेजण परब काकूंचा रस्त्यावर अपघात झाल्याचे सांगत येतात. काही क्षणात आईदेखील तेथून गायब होते. एकत्र कुटुंब पद्धती का हवी, घर हसते खेळते का असावे, याचा उत्तम संदेश अमर हिंद मंडळ संस्थेने या नाटकातून दिला. नेपथ्यासह उत्तम ट्रिकसिनचा वापर मालवणी भाषेतील एकत्र कुटुंबपद्धतीवर टाकलेला प्रकाश रसिकांना भावला. फ्लॅश बॅकची कल्पना तर अप्रतिम होती.

नाटकातील सूत्रधार आणि कलाकार असे - रंगभूषा - अनिल कासकर, रंगभूषा सहाय्यक - सीमा कोल्हटकर, प्रकाशयोजना - संजय तोडणकर, सहाय्यक - नितीन बाईकर, विजय ठीक, सार्थक चव्हाण, विजय राणे, जान्हवी मगर, सोनाली साळवी. वेशभूषा - योगिता बेडेकर, संगीत - सम्राट साळवी, संगीत संयोजन - नीतेश परब, नेपथ्य - समीर चव्हाण

पात्र परिचय - आई-प्रियांका जंगम, सुभाष- सुभाष तोडणकर, दीदी-विजया गुंडप, अभिषेक-समीर चव्हाण, छोटा अभिषेक - राजवीर आवळे, छोटी दीदी - माऊली साळवी, आजी - योगिता बेडेकर, तात्या परब - सज्योत मयेकर, पाटील काकू - अपेक्षा रानडे, भटजी - निनाद शिंदे, सोबत शांतनू रसाळ, रोहित भांडवलकर, प्राजक्ता जोगदंड, वेधान दारोळे, सानिका ठकार, श्रेया कापडी, देवेश गवळी, सोनल मसळे, ओंकार खुलिंगे, प्रतिश म्हाडगुत, सुमेध कदम, प्रताप आधाने, प्रेरणा रातांबे, कौशल राणे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande