
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.) : अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका कॉस्मेटिक दुकानाच्या आड येत महिलांना ब्लॅकमेल करून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे.
या प्रकरणी पीडित महिलेकडून अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, पीडित महिला नेहमी संबंधित दुकानातून सामान खरेदी करत असे. दुकान मालकाशी ओळख वाढल्यानंतर आरोपीने “नवीन प्रॉडक्ट्सचे फोटो पाठवतो” असे सांगून तिचा मोबाईल नंबर मिळवला. पुढे महिलेच्या पतीची चारचाकीही आरोपी दुकानदाराने खरेदी केली, ज्यामुळे त्याच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला.
महिलेच्या तक्रारीनुसार, एका दिवशी दुकानात आणि आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने तिच्या छेडछाड करून नको त्या ठिकाणी स्पर्श केला. या घटनेचा मोबाईल व्हिडिओ असल्याचे सांगत, दुकानदाराचे दोन मित्रांनी महिलेचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. बदनामी टाळण्यासाठी पीडित महिलेला पाच लाख रुपये देण्यास भाग पडले. तक्रारीत असेही नमूद आहे की, ब्लॅकमेलिंगमध्ये एकूण चार आरोपी सहभागी होते आणि त्यांच्याकडून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धर्मांतराची अट घालण्यात आली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एक सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
कॉस्मेटिक दुकानाच्या नावाखाली घडलेल्या या गंभीर प्रकरणाचे तपास अधिक खोलवर सुरू असून, अकोला शहरातील नागरिक या प्रकरणाकडे गंभीर दृष्टीने लक्ष ठेवत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे