
रायगड, 03 फेब्रुवारी (हिं.स.) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलीस ठाणे हद्दीत एसएसटी (स्थिर सर्वेक्षण पथक) कडून वाहन तपासणी सुरू असताना अपघाताची घटना घडली आहे.
माणगाव–मोर्बा रोडवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता पोलिसांनी बॅरिकेटिंग करून वाहन तपासणी सुरू केली होती. यावेळी आरोपी (रा. मोर्बा) याने स्कुटी क्रमांक एमएच 06 सीएस 2342 ही भरधाव वेगाने चालवत थेट बॅरिकेटला धडक दिली.या अपघातात ड्युटीवर असलेले फिर्यादी पोलीस कर्मचारी व साक्षीदार तसेच स्वतः आरोपी यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून स्कुटीचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार मंदार लहाने करत आहेत.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके