
रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : बँक ऑफ इंडियाच्या १४ जिल्ह्यांच्या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत देवरूख येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
छोट्या शहरात मोठ्या स्तरावरील क्रीडा स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या १४ जिल्ह्यांमधून ६ संघांची निवड करण्यात आली असून, एकूण ५४ पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला ओपन सिंगल्स, ओपन डबल्स तसेच पुरुष व महिला सांघिक संघ अशा विविध गटांत सामने रंगणार आहेत.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान देवरूखवासीयांना बँक ऑफ इंडियाच्या खेळाडूंचा दर्जेदार खेळ अनुभवता येणार आहे.
स्पर्धेपूर्वी गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे व डेप्युटी झोनल मॅनेजर अंजनी आझाद यांच्या उपस्थितीत खेळाडूंसाठी मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली आहे. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या माध्यमातून बँकेची प्रतिमा उंचावावी व देवरूखकरांची मने जिंकावीत, असे आवाहन नरेंद्र देवरे यांनी केले.स्पर्धेसाठी चीफ रेफ्री नंदकुमार प्रभुदेसाई (सावंतवाडी) व सहाय्यक रेफ्री दिलीप विंचू काम पाहणार आहेत.
ही बॅडमिंटन स्पर्धा देवरूख येथील सुलभाताई आपटे क्रीडा अॅकॅडमीच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन बँक ऑफ इंडिया आंचलिक क्रीडा समितीच्या वतीने करण्यात येत असून, समितीचे अध्यक्ष झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, खजिनदार विनोद कदम (देवरूख) व सचिव किरण खोपडे (रत्नागिरी) यांनी नियोजन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी