
अकोला, 13 मार्च (हिं.स.) : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC रुग्णालय) एका संतप्त रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे ताब्यात देण्याची मागणी केली. रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला.
यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांवर सलाईन स्टॅन्डसह हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या वेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली. या प्रकारामुळे रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा प्रश्नाखाली आली आहे.
या घटनेनंतर Association of State Medical Interns Maharashtra संघटनेने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन दिले आहे. यात एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी, तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेने इशाराही दिला की, या सर्व मुद्द्यांवर आज तोडगा निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पर्याय स्वीकारतील.
------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे