
नवी मुंबई पोलीस दलात मोठी प्रशासकीय कारवाई
रायगड, 04 फेब्रुवारी (हिं.स.) नवी मुंबई पोलीस खात्यात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून फसवणुकीच्या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2025 मध्ये दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणातील तक्रार अर्जाची आवश्यक सर्कल चौकशी न करता तो परस्पर दप्तरी दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रक्रियात्मक त्रुटीमुळे संबंधित आरोपीस अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत झाल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.
उमेश महरलाल उधानी यांच्याशी भूखंड तडजोडीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार 4 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आली होती. मात्र या तक्रारीवर गुन्हा दाखल न करता 11 ऑक्टोबर 2025 रोजी ती दप्तरी दाखल करण्यात आली. यानंतर संबंधित आरोपीने बेलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला.
या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित न राहता दुय्यम अधिकाऱ्याला पाठवण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. हे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे व बेजबाबदार असल्याचे नमूद करत निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे.
ब्रह्मानंद नाईकवाडी हे सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत होते. या प्रकरणी पुढील विभागीय चौकशी सुरू आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके