

रायगड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
दामन पंचायत समिती गण २४ मधील निवडणूक चुरशीची होत असून अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट सुमित साहेबराव साबळे यांनी आपल्या प्रचाराला मोठी गती दिली आहे. घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत लोकसंपर्कावर भर देणारी प्रचार पद्धत त्यांनी स्वीकारली असून त्यांना विविध समाजघटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या प्रचार यंत्रणेने केला आहे.
आजाद समाज पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून साबळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आपण सर्वसामान्य कुटुंबातील वकील असून कोणत्याही मोठ्या राजकीय घराण्याचे पाठबळ नसताना केवळ जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी प्रचारसभांमध्ये नमूद केले. त्यांच्या मते, कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने व स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत आहेत.
दामन गण २४ मध्ये आगरी, आदिवासी, मुस्लिम, बौद्ध, मराठा आदी विविध समाजघटक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या सर्व समाजांमध्ये सलोखा व एकोपा टिकवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे साळे यांनी स्पष्ट केले. समाजात भेद निर्माण करण्याऐवजी सर्वांना सोबत घेऊन विकासकामे राबविण्याची भूमिका त्यांनी मांडली.
प्रचारादरम्यान अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचे प्रश्न समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी स्वच्छतागृह, रस्ते, पिण्याचे पाणी व इतर नागरी सोयींची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आदिवासी व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्याविरोधात होत असलेला अपप्रचार व आरोप त्यांनी फेटाळून लावत, राजकारणात वैचारिक लढाई असावी; समाजात फूट पाडणारे प्रकार टाळले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता मतदारांनी स्वविवेकाने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दामन पंचायत समिती गण २४ साठी मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार असून मतदारांनी आपल्या ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून साथ द्यावी, असे आवाहन अॅडव्होकेट सुमित सावळे यांनी केले आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे या गणातील प्रचार वातावरण अधिकच रंगत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके