
बीड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।बीड लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाडा विभागातील रखडलेले व अत्यावश्यक रेल्वे प्रकल्प पुर्ण करून घेण्यावर खा. बजरंग सोनवणे यांनी प्रयत्न सुरू केला आहे. रखडलेल्या रल्वेमार्गाचे काम मार्गी लावण्यासाठी संसद भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे, संचार व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खा. बजरंग सोनवणे यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मराठवाड्याच्या दळणवळण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
यावेळी मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गाचा मुद्दा बैठकीत अग्रक्रमाने मांडण्यात आला. मार्च २०२५ मध्ये या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या प्रकल्पाचा डीपीआर तातडीने पूर्ण करून प्रशासकीय मान्यता देत प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, घाटनांदूर रेल्वे स्टेशन व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी पुन्हा मांडण्यात आली.
नागरिकांसाठी बार्शी नाका (बीड) परिसरात सुलभ ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याची गरज आहे, शिवाय नागरिकांची तशी मागणी देखील असल्याचे खा. सोनवणे यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले. या रेल्वे स्थानकामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होऊन बीड शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कोविडपूर्वी असलेले थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
'विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी तसेच नोकरदार वर्गाची वाढती गरज लक्षात घेता बीड-अहिल्यानगर-मुंबई व बीड-अहिल्यानगर-पुणे या मार्गावर दररोज धावणाऱ्या इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या सर्व विषयांवर अश्विनी वैष्णव यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis