मतदान शांततेत पार पडावे म्हणून रायगड जिल्ह्यात मनाई आदेश लागू
रायगड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान शांततेत पार पडावे म्हणून रायगड जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मतदान केंद्राभोवती 100 मीटर परिसरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिय
Prohibitory orders imposed in Raigad district to ensure peaceful voting


रायगड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान शांततेत पार पडावे म्हणून रायगड जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मतदान केंद्राभोवती 100 मीटर परिसरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये (पोलिस अधीक्षक कार्यक्षेत्रात) संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.

हा आदेश मतदान सुरू होण्यापूर्वीच्या 24 तासांपासून लागू राहणार असून 5 फेब्रुवारी 2026 रात्री 12 वाजता ते 7 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाच्या हद्दीत प्रभावी राहील.

काय आहे मनाई आदेशातील प्रमुख निर्बंध ? : पाचपेक्षा जास्त व्यक्तींचे जमाव किंवा फिरणे प्रतिबंधित. निवडणूक प्रचार, सभा, बैठका, मिरवणुका यांना मनाई. राजकीय प्रचारासाठी बल्क मेसेजिंगला बंदी. मतदान होणाऱ्या हद्दीत मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते / नेते थांबू शकणार नाहीत. लाऊडस्पीकर/मेगाफोन वापरास बंदी. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, वायरलेस किंवा इतर संपर्क साधने घेवून जाण्यास मनाई आहे. (निवडणुकीशी संबंधीत कामाकरिता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी व सुरक्षेकरीता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी वगळून).

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात लाऊडस्पीकर/मेगाफोन वापरणे / आरडा-ओरड करणे / गोंधळ घालणे/ गैरवर्तन करणे इत्यादी कृती करण्यास मनाई आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस शस्त्र घेवून जाण्यास मनाई आहे. (अपवाद -मतदान केंद्राच्या सुरक्षेकरिता नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी, ज्या व्यक्तीस SPG/Z+ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशा व्यक्तीस साध्या वेशात एक सुरक्षा रक्षक शस्त्र लपवलेल्या स्थितीत घेवून जाता येईल), मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आस्थापना चालू ठेवण्यास मनाई आहे. मतदारांना देण्यात येणारी चिड्डी पांढऱ्या कागदावर असावी, त्यावर कोणत्याही उमेदवाराचे नाव, पक्षाचे चिन्ह, पक्षाचे नाव नसावे. मतदान केंद्राच्या परिसरात पक्षाचे कार्यकर्त्यांचे निवासस्थाने असल्यास त्याठिकाणी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदानाकरिता जाणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाहण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस वाहन आणण्यास मनाई आहे. (अपवाद अपंग /वृध्द / आजारी मतदारांना घेवून येणारी वाहने). मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसराचे आत राजकीय पक्षांचे / उमेदवारांचे निवडणूक बुथ लावण्यास मनाई आहे.

मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर निवडणूक बुथ लावतांना अटींचे पालन करावे. बुध लावण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी व बुथ लावण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना आगावू माहिती द्यावी. प्रत्येक बुथवर कमाल एक टेबल, दोन खुर्चा असाव्यात.

प्रचार कालावधी संपल्यानंतर निर्बंध :- प्रचार कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष प्रचाराला भरीव चालना देण्यासाठी, मतदार संघाच्या बाहेरुन पाठीराख्यांना आणण्यासह त्यांच्या समर्थकांची हलवाहलव करतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, प्रचार कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघात कोणताही प्रचार होऊ नये यासाठी, बाहेरुन आणलेले आहेत व जे त्याच्या / तिच्या मतदारसंघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते / पक्ष कार्यकर्ते / मिरवणुकीतील कार्यकर्ते / प्रचार कार्यकर्ते आदींना नियमितपणे मतदारसंघामध्ये उपस्थित राहता येणार नाही, कारण प्रचार संपल्यानंतर, त्यांच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येऊ शकते.

उल्लंघन केल्यास कारवाई :- मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, शांततेत व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande