
रायगड, 07 फेब्रुवारी (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत मौजे कैरे गावातील कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेड कंपनीच्या आवारात आंदोलन करून कंपनीचे गेट अर्धवट बंद करत कर्मचाऱ्यांच्या बस अडवल्याप्रकरणी ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या काही कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3:08 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित आरोपी कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असून त्यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या विविध मागण्यांसाठी कंपनीला लेखी निवेदन दिले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवस्थापनाने 27 जानेवारी रोजी बैठक आयोजित केली होती.
बैठकीदरम्यान कंपनी व्यवस्थापक व एचआर विभागाने वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच निर्णय कळवू असे सांगितले. मात्र, चर्चा अर्धवट सोडून संबंधितांनी बैठकीतून बाहेर पडत कंपनी गेटकडे मोर्चा वळवला. त्यांनी जबरदस्तीने कंपनीचे मुख्य गेट अर्धवट बंद करून पहिल्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही बस अडवून धरल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गु.र. नं. 24/2026 नुसार बीएनएस कलम 126(2), 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कोकाटे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके