
निफाड, 07 फेब्रुवारी (हिं.स.)।
कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील बसथांब्याजवळील स्वर्गीय माधवराव पहिलवान जाधव पतसंस्थेसमोर असलेले इंडिया कंपनीचे एटीएम चोरट्यांनी पहाटे तीन ते चारच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न केला. लोखंडी टॉमी व सळईच्या सहाय्याने या एटीएमची तोडफोड केली. सुदैवाने एटीएमचा आतील भाग भक्कम असल्याने रक्कम चोरण्यात चोरट्यांना अपयश आले. सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती आत व एक व्यक्ती बाहेर बाहेर दिसत असून, त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्यानेे ते स्पष्ट दिसत नाहीत. मात्र, पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.भरवस्तीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानेे आजूबाजूचे गाळेधारक, व्यावसायिक, टपरीधारकांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही अनेक दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून व शटर वाकवून चोर्या करण्याचा प्रयत्न झाला आहे.दरम्यान, एटीएम फोडण्यात आल्याचे वृत्त कळताच ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंडारे, उपनिरीक्षक डोळस, सैंदाणे, जाधव, हवालदार मदने, बैरागी, गांगुर्डे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असून, संबंधितांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास पोलीस अधिकार्यांकडून व्यक्त झाला. पोलिसांनी बसस्थांबा परिसरात गस्त घालावी, अशी मागणी व्यावसायिकांकडूनहोत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV