
रायगड, ७ फेब्रुवारी (हिं.स.) : पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागझरी गावात ईलाईट हॉटेल अँड रिसॉर्टमधील मालकावर तीन संशयितांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याची आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी हे नागझरी येथील ईलाईट हॉटेल अँड रिसॉर्टचे मालक आहेत, आणि त्यांच्या रिसॉर्ट परिसरात नवीन बंगल्यांचे बांधकाम सुरू आहे.पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ ते ३ महिंद्रा कंपनीच्या कारने रिसॉर्टमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस धमकावल्याचा आरोप आहे. यापैकी एका आरोपीने सोन्याचे दागिने मागितले तर दुसऱ्याने रिसॉर्टच्या बांधकामाचा ठेका स्वतःकडे घेण्याची मागणी केली.फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ यांनी त्याला एका रूममध्ये नेऊन दरवाजा आतून बंद केला आणि कमरेवर ठेवलेले पिस्तूल फिर्यादीकडे रोखले. गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता ती मिसफायर झाली. आरोपींनी फिर्यादीला मारहाणीचे व्हिडिओ दाखवत धमकावले आणि पैशांची मागणी केली. फिर्यादीच्या पँटच्या खिशातून जबरदस्तीने ५० हजार रुपयांची रोख रक्कम काढून आरोपी तेथून पळून गेले.
या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख करीत आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके