
मुंबई, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। मुंबईत फेब्रुवारी महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली असून त्यातच पाण्याच्या समस्येची भर पडत आहे. अशातच वांद्रे पश्चिम परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करण्यात येणार असून या कालावधीत एकूण १४ तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
ही दुरुस्ती कार्यवाही कुरेशी नगर झोपडपट्टीजवळील एमएचएडीएच्या मोकळ्या भूखंडातून तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जाणाऱ्या जलवाहिनीवर करण्यात येणार आहे. या कामामुळे एच-पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
वांद्रे पश्चिमेकडील हिल मार्ग, पेरी मार्ग, मॅन्युअल गोन्साल्विस मार्ग, सेंट अँड्र्यूज मार्ग, सेंट पॉल मार्ग, कार्टर मार्ग, पाली गाव, चिंबई गाव, शेर्ली गाव, कांतवाडी परिसर, खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, चुईम गावठाण, गझदरबंध झोपडपट्टी, खार पश्चिमेचा काही भाग, हनुमान नगर झोपडपट्टी, लक्ष्मी नगर, युनियन पार्क रस्ता क्रमांक १ ते ४, पाली हिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परिसर, पाली पठार झोपडपट्टी, खारमधील १५ ते २० वा रस्ता, चॅपल मार्ग, वेरोनिका मार्ग, डॉ. पीटर डायस मार्ग, सेंट जॉन बॅप्टिस्ट मार्ग, माउंट मेरी कॅथेड्रल परिसर, के. सी. मार्ग, एल. के. मेहता मार्ग, बाजार रस्त्याचा काही भाग, ए. के. वैद्य मार्ग, झिगझॅग मार्ग, कोल डोंगरी, नर्गिस दत्त मार्ग आणि पाली माला मार्ग या भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड, बी. जे. मार्ग, एच. के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी या परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो मध्यरात्रीनंतर रात्री १ ते पहाटे ४.३० या वेळेत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर एच-पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारी म्हणून आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा आणि दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून आणि गाळून पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule