
रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।तालुक्यातील मौजे वरवठणे येथे घरातच बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून म्हसळा पोलिसांनी रविवारी (दि. ८) पहाटे धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सुमारे १ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी पोलिसांना धक्काबुक्की करून फरार झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरवठणे येथील आरोपी नियाज महमुद तालीब यांच्या राहत्या घरात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस शिपाई अक्षय दौलत पुरी व पथकाने सकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून मांस वाटपाची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांना पाहताच तिसऱ्या आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला धक्का देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला व घटनास्थळावरून पळ काढला.कारवाईदरम्यान पोलिसांनी एक पियाजिओ रिक्षा (MH 06 BW 2247), एक होंडा डीओ स्कूटी (MH 06 CM 1305), सुमारे ७० किलो गोवंश मांस, तसेच कत्तलीसाठी वापरलेले सुरे, कोयता, लाकडी कुंडा व इतर साहित्य जप्त केले.
या प्रकरणी नियाज महमुद तालीब (वय ४२), मेहफूज किफायती तालीब (वय २०) व एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे संबंधित कलम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एस. पी. रोहिणकर करीत आहेत. कारवाईवेळी पोलीस कर्मचारी चितारे, पुरी, मुल्ला, कानावडे, शिंदे तसेच चालक पोलीस हवालदार पोळ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके