
अकोला, 10 मार्च (हिं.स.)।
देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २३ मार्च रोजी नागपूर येथे आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीनंतर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली. देशाच्या आर्थिक धोरणांपासून ते राजकीय निर्णयांपर्यंत अनेक बाबतीत सरकारने शरणागती पत्करल्याचा आरोप त्यांनी केला.
अॅड. आंबेडकर म्हणाले की, “भारत सरकार एकंदरीत ‘सेल आऊट’ झालेले आहे. हा केवळ आर्थिक सेल आऊट नाही, तर देशाचे सार्वभौमत्वही गहाण ठेवण्यात आले आहे. आर्थिक बाजारपेठ सरेंडर करण्यात आली आहे, तसेच राजकीय निर्णय घेण्याची शक्तीही दुसऱ्यांच्या प्रभावाखाली गेली आहे. अमेरिकेने भारताला केवळ ३० दिवसांसाठी पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची परवानगी दिल्याची बाब देशाच्या धोरणात्मक स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे