
रत्नागिरी, 11 मार्च, (हिं. स.) : चिपळूण पालिकेने सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहयोगाने आयोजित प्लास्टिकमुक्त चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडला.
चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२५ पासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे बक्षीस वितरण यापूर्वीच झाले होते. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या चार महिन्यांचा बक्षीस वितरण सोहळा निवडणूक कार्यक्रमांमुळे रखडला होता. या चार महिन्यांचा एकत्रित बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी झाला.
या कालावधीत एकूण २७२ महिलांनी सहभाग घेत २४११ किलो प्लास्टिक जमा केले. स्पर्धेच्या निकालानुसार सौ. उमा आलेकर यांनी सर्वाधिक प्लास्टिक जमा करत विशेष कामगिरी केली, तर सौ. स्वप्नाली निवाते यांनी सर्वाधिक महिलांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले.
सातपेक्षा अधिक कुपन देणाऱ्या १६८ महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये शीला शंकर ओतारी भाग्यवान ठरल्या. एकूण सहभागी २७२ महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला, त्यामध्ये प्रियांका विनोद शिंदे चिपळूण होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या.
कार्यक्रमाला चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, उपसभापती राणी महाडिक, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण व क्रीडा सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवारे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी