
बीड, 11 मार्च (हिं.स.)। मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जाहीर झालेल्या ऐतिहासिक तरतुदींचे जोरदार समर्थन केले. राज्याच्या अर्थसंकल्पात बीड जिल्ह्याचा 'आकांक्षित जिल्हा' योजनेत समावेश करण्यात आल्याने आता शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने 'मास्टर प्लॅन' मंजूर केला असून, आमदार मुंदडा यांनी यासाठी केलेल्या दीर्घकालीन पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे.
शेतकरी हिताचा विचार करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवत त्यात शेतमजुरांचा समावेश करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मुंदडा यांनी नमूद केले. तसेच महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आगामी वर्ष 'सामाजिक समता वर्ष' म्हणून साजरे करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कर्जमाफी आणि नैसर्गिक शेती अभियानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असून हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis