
चंद्रपूर, 11 मार्च (हिं.स.) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी आंतरराज्यीय टोळीविरोधात धडक कारवाई करून ५०० रूपये दराच्या ९१ लाख १ हजार रूपयांच्या रंगीत छायांकीत नोटा आणि छापणी साहित्य जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, शहराजवळील उर्जानगर येथील मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये काही व्यक्ती अवैधरित्या रंगीत छायांकीत नोटा तयार करत आहेत. या माहितीवरून पथकाने सापळा रचून फ्लॅटवर छापा टाकला असता, फ्लॅट बंद असल्याचे आढळले.
बंगाली कॅम्प परिसरातील फ्लॅट मालक सुमित कालीपथ पॉल यास बोलावून विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितले की, फ्लॅट मागील एक महिन्यापासून मध्यप्रदेश येथील लोकांना भाड्याने दिला होता. फ्लॅट मालकाच्या आणि पंचाच्या उपस्थितीत फ्लॅटचे कुलूप तोडून झडती घेतली असता, बेडरूममध्ये १० बॉक्स आणि त्यामध्ये भारतीय चलनासारखी ५०० रूपये रंगीत छायांकीत नोटा, एक कलर प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
तपासात आंतरराज्यीय आरोपीचा शोध लागला आणि मध्यप्रदेश राज्यातील रतलाम जिल्ह्यातील पंचेड नयेथील शुभम दिनेश नागर (वय २६) यास ताब्यात घेतले गेले. आरोपीने फसवणुकीच्या उद्देशाने रंगीत छायांकीत नोटा तयार केल्याचे कबूल केले.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास दुर्गापूर पोलिस करत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव