
रायगड, 11 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला एनआयए अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या आरोपींनी एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 26 लाख 40 हजार रुपयांनी फसवले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुप्रभा सोसायटी, दुसरा मजला, बी विंग, विनानगर, खालापूर येथील फिर्यादी हा बँक ऑफ इंडिया येथून निवृत्त झालेले आहेत आणि सध्या घरीच राहतात. 12 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता, अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना व्हॉट्सऍप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला एनआयए अधिकारी म्हणून ओळख दिली आणि सांगितले की, नाशिक येथे फिर्यादींच्या नावावर सुरू असलेल्या सिमकार्डवरून अश्लील कमेंट होत आहेत तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संस्थेशी संबंधित फसवणूक प्रकरणात त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर होतो आहे.
भीती निर्माण करून आरोपींनी फिर्यादींना बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया येथील एफडी मोडून रक्कम पेंशन खात्यात वर्ग करण्यास सांगितले. त्यानंतर क्षीरसागर टेक्सटाईल, सोलापूर आणि मे. एन. उजमसी ऍन्ड कंपनी यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यांमध्ये 26,40,000 रुपये पाठविण्यास भाग पाडले.त्यानंतर आरोपींनी फिर्यादींच्या नावावर अटक वॉरंट असल्याचे सांगून, आरबीआयकडून पडताळणीसाठी फोन येईल आणि 3 दिवसांत रक्कम परत मिळेल असे सांगितले; मात्र नंतर मोबाईल बंद करून टाकला.
खोपोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 85/2026 नोंदवला असून, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (2008 सुधारणा) कलम 66(D) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 319(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे करीत आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)