
दरमहा १० टक्के व्याज घेऊनही केली मारहाण
नाशिकरोड, 11 मार्च (हिं.स.) : सुमारे ७ टक्के व्याजाने घेतलेल्या रकमेचे व्याज देऊन रकमेची फेड केली असतानाही पुन्हा व्याजाची रक्कम मागून शिक्षकाला जबरदस्तीने डांबून ठेवत त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या सावकारासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटना राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या जिल्ह्यातच झाली आहे त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर गुरूंनाच मान नसेल तर राज्यामध्ये काय परिस्थिती असेल ही विचार करण्यासारखी परिस्थितीनिर्माण झालेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी इखलाख अहेमद मुश्ताक अहेमद (रा. रोशन व्हिला, धोंगडेनगर, नाशिकरोड) हे नाशिकरोड येथे ऍग्लो उर्दु हायस्कूलमध्ये शिक्षक पदावर नोकरी करतात. अहेमद यांनी सावकारी व्यवसाय करणाऱ्या चंद्रशेखर प्रभाकर शिंदे उर्फ पिंटू शिंदे (रा. नाशिकरोड) याच्याकडून सुरुवातीस दरमहा ७ टक्के व्याजाने २ लाख ५० हजार रुपये आणि त्यानंतर १० टक्के व्याजाने २ लाख रुपये आणि पुन्हा १० टक्के व्याजदराने २ लाख रुपये घेतले होते. या वेगवेगळ्या रकमांचे दरमहा व्याज शिंदे यांना देत असताना देखील आणि सुरुवातीचे घेतलेले २ लाख रुपये हे व्याजाची रक्कम मिळून ४ लाख ३७ हजार ५०० रुपये देऊन फेडले. त्यानंतर पुन्हा व्याजाने
घेतलेल्या अडीच व दोन लाख रुपयांचे दरमहा व्याज शिंदे याला देत होते. मात्र काही वेळेस आर्थिक अडचणीमुळे व्याजाची रक्कम वेळेवर देणे शक्य झाले नाही. त्यामुळे खासगी सावकार शिंदे याने चिडून जाऊन अनेक वेळा फिर्यादी मोहम्मद व त्यांच्या मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. तसेच व्याजाची रक्कम वसुल करण्यासाठी फिर्यादीच्या सासरचे घर विक्री करुन पैसे देण्यासाठी वारंवार धमकावले.त्यानंतर आरोपी विशाल विजय बेहेनवाल (रा. देवळाली गाव) याच्याशी केलेल्या व्यवहारापोटी त्यांना दिलेला चेक खासगी सावकार शिंदे याने विशाल बेहेनवाल याच्याशी संगनमत करून त्याचा गैरवापर केला आणि फिर्यादीने शिंदे याच्याकडून २ लाख रुपये घेतलेले असतानाविशाल बेहेनवाल याच्याकडून प्राप्त केलेल्या चेकमध्ये ३ लाख रुपये नमूद करुन फिर्यादीविरुद्ध कोर्टात खोटी केस दाखल केली आहे.
सावकर शिंदे याने त्याचा साथीदार अभिजित उर्फ बबलू पाटील (रा. जेलरोड, नाशिकरोड) याच्यासोबत वारंवार फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसून फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने व्याजाची रक्कम खंडणी स्वरुपात वसूल केली आहे. शिंदे याने आतापर्यंत जबरदस्तीने व धाक दाखवून खंडणीस्वरुपात फिर्यादीची इच्छा नसताना फिर्यादीकडून व्याजापोटी एकूण ८ लाख ५५ हजार ५०० रुपये वसूल केले आहेत. तसेच दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी शिंदे याने त्याच्या साथीदारासह फिर्यादीच्या घरात घुसून बळजबरीने
चेकवर सही करण्यास सांगितले.
फिर्यादीने सही करण्यास नकार दिल्याचा राग आल्याने खासगी सावकार शिंदे याने त्याच्या टोयोटा फॉर्च्यूनर कारमध्ये फिर्यादी अहमद यांना बळजबरी बसवून मुक्तधाम येथील त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तेथे फिर्यादीला मारहाण करुन ऑफिसमध्ये जबरदस्तीने डांबले व आजच्या आज सगळा हिशेब करून दे, नाही तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबाचा हिशोब करतो, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी नोकरी करत असलेल्या अॅग्लो उर्दू हायस्कूल येथे १० जुलै २०२३ रोजी जाऊन शाळेतील फिर्यादीच्या इतर सहकारी शिक्षकांच्या समक्ष व्याजाच्या वसुलीसाठी फिर्यादींना धमकावले.
हा प्रकार १८ नोव्हेंबर २०१७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकार चंद्रशेखर शिंदे, अभिजित बबलू पाटील, विशाल बेहेनवाल व अनिल दुसाने या चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV