
बीड, 11 मार्च (हिं.स.)।धारूर घाटातील एका धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला. हैदराबादहून छत्रपती संभाजीनगरकडे माल घेऊन जाणारा टँकर सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. दरीत कोसळताच टँकरने पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळा उसळल्या. मात्र चालक महादेव बिक्कड यांनी प्रसंगावधान राखत टँकरमधून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. किरकोळ जखमी झालेल्या चालकावर सध्या केज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घाटात गेल्या वर्षभरातील ही सहावी मोठी दुर्घटना असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे धारूर घाट आता मृत्यूचा सापळा बनत आहे. प्रशासनाने घाटाचे रुंदीकरण आणि सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis