ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती
रायगड, 11 मार्च (हिं.स.)। राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाबाबत विविध संघटनांकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर या धोरणाला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी
ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला स्थगिती


रायगड, 11 मार्च (हिं.स.)। राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाबाबत विविध संघटनांकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर या धोरणाला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांनी दिली.

परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयात राज्यभरातील विविध ऑटोरिक्षा व टॅक्सी संघटनांकडून खुले परवाना धोरण बंद करण्याबाबत विनंती अर्ज प्राप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर दि. 9 मार्च 2026 रोजी परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान राज्यात लागू असलेल्या ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणाला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले. त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना यासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयानंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यासाठी देण्यात येणाऱ्या इरादापत्र (LOI) देण्याची प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सध्या बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यातील विद्यमान ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी खुले परवाना धोरणामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे शासनाने या विषयावर पुनर्विचार करण्यासाठी तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, पुढील आदेश मिळेपर्यंत नवीन परवान्यांसंदर्भातील सर्व कामकाज स्थगित राहणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande