

रायगड, 11 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ हा उपक्रम खोपोली नुकताच उत्साहात पार पडला. स्थानिक लघुउद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरला.
महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना देणे तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. ‘अमृत’ संस्थेच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतून कौशल्य प्राप्त केलेल्या लाभार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, त्यांची विक्री कौशल्ये वाढावीत आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ ही संकल्पना कार्यरत आहे.
खोपोली येथे आयोजित अमृत पेठमध्ये स्थानिक उद्योजकांचे 40 हून अधिक स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलमध्ये विविध प्रकारची स्वदेशी उत्पादने, घरगुती पदार्थ, हस्तकला वस्तू, सजावटी साहित्य, तसेच इतर लघुउद्योगातील वस्तूंची विक्री करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या स्टॉलना मोठ्या प्रमाणावर भेट देत खरेदी करून उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
उपक्रमादरम्यान दररोज लकी ड्रॉ कूपन काढण्यात आले. त्यातून दर दिवशी तीन विजेत्यांची निवड करून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा सहभाग अधिक वाढल्याचे दिसून आले.
अमृत पेठ उपक्रमाचे नियोजन अमृतचे कर्मचारी शैलेश मराठे व मंगेश ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच उद्योजक संजय तन्ना, अमित कुलकर्णी, भारती शहा आणि महर्षी यांचे विशेष सहकार्य लाभले. या तीन दिवसांच्या उपक्रमाला खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे स्थानिक लघुउद्योजकांना थेट बाजारपेठ मिळण्यासोबतच स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)